उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान-- एक मोठे यश
महाराष्ट्राचे कृषिमंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी माहिती दिली की राज्यामध्ये उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानाच्या माध्यमातून एका मोठ्या मोहिमेची अंमलबजावणी दोन आठवड्यांसाठी सुरू झालेली आहे. या मोहिमेमध्ये 19 लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला असून 36 हजार कार्यक्रमांचे आयोजन या मोहिमेअंतर्गत करण्यात आलेले आहे. श्री पाटील यांनी असेही सांगितले बारा हजार शेतकरी कार्यशाळांचे आयोजन या कार्यक्रमांतर्गत करण्यात आले आणि तीन लाख शेतकऱ्यांना या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले.
ॲग्रोवन यांनी यासंदर्भात सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले आहे. या अभिनव योजनेचे आयोजन 25 मे ते 28 जून 2019 रोजी करण्यात आले होते. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट शेतकऱ्यांना विविध योजनांविषयी माहिती देणे तसेच कृषी क्षेत्राशी संबंधित विविध योजनांची अंमलबजावणी प्रभावी पद्धतीने करणे अशा पद्धतीचे होते. त्याचबरोबर शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापर, सरकारी योजना इत्यादींविषयी जास्तीत जास्त माहिती सादर करणे हेही उद्दिष्ट यामधून साध्य करण्यात आले. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे खरेदी वेळी घ्यावयाची काळजी. कीटकनाशके-खते यांची खरेदी, बियाण्याची प्रक्रिया, सरकारतर्फे सुरू असलेल्या विविध लागवड योजना, सिंचन पद्धती, जमिनीची आरोग्य तपासणी अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कृषी क्षेत्रातील विविध तज्ञ आणि अधिकारी यांनी या कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांबरोबर संवाद साधला तसेच कार्यशाळांमध्ये सहभाग घेतला.
राज्याच्या कृषी विभागाने उत्पन्न वाढविण्यावर भर दिलेला आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञान आणि मेहनत यांची योग्य सांगड घालून शेतकऱ्यांना अधिकाधिक आत्मनिर्भर करण्याचा मानस आहे. या कार्यक्रमांतर्गत ज्या कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यांना शेती-शाळा असे संबोधण्यात आले. अशा 12000 कार्यशाळांचे आयोजन उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान मार्फत करण्यात आले. याद्वारे शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, नवीन उपक्रम ,आणि प्रयोग यांची माहिती देण्यात आली. प्रामुख्याने या कार्यक्रमांतर्गत ज्वारी, ऊस, कडधान्य ,भात, सोयाबीन, कापूस, आणि तूर डाळ यांचे उत्पन्न वाढीवर भर देण्यात आला.
महाराष्ट्राचे कृषिमंत्री श्री चंद्रकांत पाटील यांनी या अभियानामार्फत एका अभिनव उपक्रमाची सुरुवात राज्यामध्ये केलेली आहे. श्री पाटील यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रगतीवर भर दिलेला असून त्यांची विचारधारा शेतीमध्ये नेहमीच आधुनिक तंत्रज्ञान, सरकारच्या विविध योजना, जास्तीत जास्त पीक घेण्यावर भर, तसेच शेतकरी कुटुंबातील महिलांचा समावेश या व्यवसायासाठी करणे, विविध सिंचन योजना आणि शेतीमालाला योग्य भाव अशा विविध घटकांना समाविष्ट करते.
या कार्यक्रमाच्या अंतर्गत विविध कार्यशाळा, प्रशिक्षण केंद्र यांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील विविध घटक, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आणि एकंदरच शेती क्षेत्राच्या विकासासाठी एकत्रितरीत्या प्रयत्न करताना दिसतात आणि आणि सरकारचा हा प्रयत्न संशोधन, नाविन्यपूर्ण प्रकल्प ,आणि तंत्रज्ञान या दृष्टीने अत्यंत स्तुत्य असून याद्वारे प्रात्यक्षिक ज्ञानावर ही भर दिल्याचे दिसून येते. विविध निरीक्षणे, अभ्यासपूर्ण निष्कर्ष या सर्वांचा उपयोग शेतकऱ्यांच्या हितासाठी होईल आणि ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला अर्थातच बळकटी मिळेल. या कार्यक्रमाला शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात साथ मिळाली आणि निश्चितच ही गोष्ट राज्य सरकारसाठी अशा अधिकाधिक कार्यक्रमांच्या आयोजनाच्या दृष्टीने प्रेरणादायक असेल.
श्री चंद्रकांत दादा पाटील यांचे स्वतःचे मूळ ग्रामीण भागात असल्यामुळे त्यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केलेला आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांची चांगल्या पद्धतीने जाणीव आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी नेहमीच कर्जमाफी, सरकारी योजनांमधून आर्थिक फायदे, नैसर्गिक आपत्तीवर मात करताना आर्थिक मदत, पिक विमा अशा विविध योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान हा एक उत्कृष्ट प्रयोग महाराष्ट्र शासन आणि कृषी विभाग यांनी सादर केलेला आहे. या संकल्पनेस आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही आशा व्यक्त करतो की अशाच पद्धतीचे कार्यक्रम भविष्यातही हाती घेतले जावेत.
Comments
Post a Comment